नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी आई सोनियांची जागा रायबरेलीतून खासदारकी ठेवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ते वायनाड सोडू शकतात. काँग्रेसच्या पहिल्या बैठकीनंतर आणि कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी राहुल यांना काँग्रेससाठी यूपी खूप महत्त्वाचे असल्याचे समजावून सांगितले.
प्रियंका गांधी पुन्हा यूपी राज्य प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारू शकतात, असेही बोलले जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी हे पद सोडले होते. राहुल यांनी जागा सोडल्यास प्रियंका वायनाडमधून पोटनिवडणूक लढवू शकतात. या माध्यमातून गांधी कुटुंबाला उत्तरेसह दक्षिणेवर आपली पकड मजबूत करायची आहे.
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आई सोनिया, बहीण प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी रायबरेली न सोडण्याचे मान्य केले. अमेठीची गमावलेली जागाही कुटुंबाला परत मिळाल्यामुळे रायबरेलीतील विजय आणखी मोठा असल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले. वायनाडपेक्षा राहुल यांना रायबरेलीमध्ये मोठा विजय मिळाला. अशा परिस्थितीत तुम्ही रायबरेली सोडल्यास उत्तर प्रदेशात चुकीचा संदेश जाईल. तसेच गांधी घराण्याच्या प्रमुखांनी नेहमीच यूपीमधून राजकारण केले. रायबरेली ही त्यांची आई सोनिया, आजी इंदिरा गांधी आणि आजोबा फिरोज गांधी यांची जागा आहे. त्यामुळे ती सोडू नये, असे सांगण्यात येत आहे.