16.1 C
Latur
Tuesday, November 19, 2024
Homeमहाराष्ट्रयुगेंद्र पवारांच्या शोरूमवर छापे

युगेंद्र पवारांच्या शोरूमवर छापे

बारामतीत प्रथमच झाडाझडती, पथक रिकाम्या हातांनी परतले

पुणे : प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या. त्यानुसार बारामतीचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मालकीच्या शरयू टोयोटा या शोरूमवर आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर अध्यक्ष असलेल्या नटराज नाट्यमंदिर या संस्थेवर छापा टाकण्यात आला. मात्र, निवडणूक अधिका-यांना या दोन्ही ठिकाणी काहीही आढळून आले नाही. या तपासणीवरून बारामतीत चर्चेला उधाण आले असून बारामतीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या काळात पैसे वाटपावरून झाडाझडती झाली. यावरून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबातही शरद पवार विरोधात अजित पवार अशी लढाई सुरू झाली आहे. बारामती मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामतीचे उमेदवार अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवीत आहेत. पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने निवडणूक चुरशीची झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी रात्री युगेंद्र पवार यांच्या मालकीच्या शरयू टोयोटा या कंपनीची अचानक तपासणी करण्यात आली. तसेच अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले किरण गुजर अध्यक्ष असेलल्या नटराज नाट्यमंदिर संस्थेचीही निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली. या दोन्ही ठिकाणी झालेल्या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही, असे बारामतीचे प्रांताधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले.

आम्ही कायद्याचे पालन करतो
शरयू टोयोटा येथे सोमवारी रात्री पथक आले. तिथे आमचा व्यवसाय आहे. पथकाला तेथे काही आढळून आले नाही. आम्ही कायद्याचे नेहमीच पालन करतो. पैसे वाटपाची तक्रार कोणी केली, याची माहिती नाही. जोपर्यंत संपूर्ण माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्याबाबत भाष्य करणे अयोग्य आहे, असे शरद पवार गटाचे युगेंद्र पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR