इचलकरंजी । शिराळा : प्रतिनिधी
इचलकरंजी इथे आज शरद पवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. पवारांनी भाषणाला सुरूवात केली. त्याच वेळी पावसालाही सुरूवात झाली. दुसरीकडे आजच बत्तीस शिराळा येथे सत्यजीत देशमुख याच्या प्रचारासाठी आयोजित सभेत देवेंद्र फडणवीसांचे भाषण सुरू असताना पावसाने हजेरी लावली. भर पावसात त्यांनी भाषण सुरूच ठेवले.
पावसात उभ्या असलेल्या लोकांनीही जोरदार घोषणाबाजी, टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत प्रतिसाद दिला. शरद पवार व्यासपीठावर आले. त्यावेळी ढगाळ वातावरण होतं. पाऊस होणार अशी चिन्हे होती. त्यामुळे पवारांनी आल्या आल्या भाषणाला सुरूवात केली. पण भाषणाला पवार जसे उठले तसा पाऊस सुरू झाला.
फडणवीसांच्या सभेत पाऊस
आज बत्तीस शिराळा इथं महायुतीचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत अचानक पाऊस सुरू झाला. या पावसात देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. या ठिकाणी उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, तुम्हाला सांगतो..आता सत्यजीत दादा तुमची सीट निवडून येणं पक्क आहे. का बरं पक्क आहे? अरे मी पावसात सभा घेतोय ना? पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच. हे शुभ संकेत आहे, असं फडणवीस म्हणाले.
ते पुढे म्हणाले, काही नेत्यांचं म्हणणं आहे की, पावसात सभा झाली की सीट निवडून येते. पण मी तुम्हाला सांगतो की, पाऊस पडो किंवा न पडो. पण मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.