23.9 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज

राज्यात ३ दिवस पावसाचा अंदाज

पुणे : विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी मात्र कोरडे हवामान राहणार आहे. कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला.

दरम्यान, पुण्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार असून, सध्या पुणेकरांना उकाडा जाणवू लागला आहे.

महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ९ जिल्ह्यांत उत्तरेकडून घुसणा-या थंड वा-यांमुळे पहाटेचे किमान तापमान १४ तर कमाल ३० ते ३२ डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. हे तापमान जवळपास सरासरीइतके किंवा त्याखाली जाणवत आहे. महाराष्ट्रातील उर्वरित २७ जिल्ह्यांत तापमान काहीसे अधिक असून, ती १७ व ३४ डिग्री से. ग्रे. दरम्यान जाणवत आहे.

फेब्रुवारीअखेर सध्याचा हिवाळी हंगाम संपून पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू होण्याचा संक्रमणाचा हा काळ असतो. साधारणपणे पूर्वमोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली दिसू लागतात. या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वा-यांच्या मिलनातून गडगडाटीसह विजा अन् गारांचा पाऊस कोसळत असतो.

सध्या हवेच्या कमी दाबाचा आस सहित वारा खंडिता प्रणालीनुसार कार्यरत आहे. बंगाल उपसागरातील उच्च हवेच्या दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वा-यातून आसाच्या पूर्वेला दक्षिणेकडून तर पश्चिमेला उत्तरेकडून एक कि.मी. उंचीपर्यंत वारे वाहत आहेत. त्यामुळे फक्त विदर्भ-मराठवाड्यातील १५ जिल्ह्यांत किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
– माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR