मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी राज्यभरातील अनेक लोकांची इच्छा आहे. यासाठी अनेकदा प्रयत्नपण करण्यात आले, मात्र, दोघांमध्ये कोणताही तोडगा अजूनही निघाला नाही. दरम्यान, एका कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच फ्रेममध्ये आल्याचे पाहायला मिळाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्यात विविध वविषयांवर चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे. भाच्याच्या साखरपुड्यात हे दोन्ही भाऊ एकाच फ्रेममध्ये दिसून आले. मुंबईतील दादरमध्ये शुक्रवारी राज ठाकरे यांच्या भाच्याचा साखरपुडा समारंभ पार पडला.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांमध्ये या कार्यक्रमात चर्चा झाली. कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये दोन्ही भावांनी एकमेकांची विचारपूस केली. तसेच, या कार्यक्रमात रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचीही भेट झाली. त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मातोश्रींसोबत संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. राजकीय घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून दोन भावांमध्ये जो दुरावा निर्माण झाला होता. तो कौटुंबीक कार्यक्रमातील भेटीमुळे कुठेतरी दूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिक या भेटीकडे एक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहेत.