28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंकडून २ उमेदवारांची घोषणा

राज ठाकरेंकडून २ उमेदवारांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘एकला चलो रे’चा नारा देण्यात आला आहे. मनसे राज्यात २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केली आहे. तर याआधी राज ठाकरे यांच्याकडून ७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून आता आणखी दोन उमेदवारांची घोषणा त्यांनी केली आहे.

राजू पाटील यांच्या कार्यालयच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे हे आज डोंबिवलीत आले होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी इथे भाषणासाठी आलो नसून माझ्या राजू पाटीलच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलोय. मतदार यादीवर शेवटचा हात फिरवत आहे. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर होईल, असे त्यांनी म्हटले.

यानंतर राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तसेच अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना राज ठाकरे स्वतः हजर राहणार आहेत, असेही त्यांनी म्हटले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केल्याचे दिसून आले.

दरम्यान, राजू पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे आज उमेदवारी जाहीर करतील, असं अपेक्षित नव्हतं. आज सोनेपे सुहागा असेच झाले. मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करेल. लोकसभेला दिलेला पाठींबा हा मोदींना दिलेला होता. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे म्हणून दिला होता, महायुतीला नव्हता. महायुतीने आम्हाला पाठिंबा दिला तरी चांगलं आणि नाही दिला तरी चांगलं, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी घोषित केलेले उमेदवारांची यादी
1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. यवतमाळ – राजू उंबरकर
8. ठाणे – अविनाश जाधव
9. कल्याण-डोंबिवली – राजू पाटील

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR