नाशिक : विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव झटकून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झालेत. राज ठाकरेंचा हा तीन दिवसीय दौरा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता राज ठाकरेंचा हा दौरा एकाच दिवसात गुंडाळणार असल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौ-यावर असून पक्षाच्या पदाधिका-यांशी संवाद- बैठका घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील मनसे पदाधिका-यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामे दिले होते. या गटबाजीमुळे राज ठाकरे हे नाराज असल्याचे समोर आले आहे.
राजीनामे दिलेल्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत काल राज ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी स्थानिक नेत्यांबाबत कार्यकर्ते, पदाधिका-यांनी अनेक तक्रारी केल्या. या तक्रारीमुळे राज ठाकरे हे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाचे नेते आणि पदाधिका-यांमध्ये सुरु असलेली धुसफूस पाहता राज ठाकरे मोठ्या निर्णयाच्या तयारीत असून मनसेची नाशिक शहर आणि जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, राज ठाकरे यांचा हा तीन दिवसाचा नियोजित दौराही एकाच दिवसात आटोपणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. तीन दिवसीय नाशिक दौ-यावर असलेले राज ठाकरे आजच मुंबईकडे रवाना होणार असून त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काल राज ठाकरे हे नाशिकमध्ये दाखल झाले होते. पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बंद दाराआड त्यांनी चर्चाही केली. मात्र त्यानंतर आता ते दौरा अर्धवट सोडून जाणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ३० तारखेला मुंबई येथे मेळावा आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.