मुंबई : केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत २ मार्चला बुद्धिस्ट परिषद होणार आहे. नाशिक येथे होणा-या या परिषदेत विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा होईल. या निमित्ताने पक्षाचा संघटनात्मक विस्तार करण्याचा प्रयत्न आहे.
या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनाही सल्ला दिला. विविध राजकीय प्रश्नांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. मुंबईत परप्रांतीयांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी घडलेल्या दादागिरीच्या घटनांना मनसेने चोख उत्तर दिले. याबाबत राज्यमंत्री आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना थेट सल्ला दिला.
आठवले म्हणाले, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे विविध भागातून येथे लोक उद्योग, व्यवसाय आणि विविध कारणांनी येतात. देशाच्या विविध भागातील नागरिक आणि भाषा व संस्कृती असलेले लोक मुंबईकडे आकर्षित होतात. राज ठाकरे यांनी अशा लोकांवर दादागिरी करू नये. मराठी भाषा आलीच पाहिजे. त्यासाठी त्यांना मराठी शिकण्याची मुभा द्यावी. मात्र सक्ती करू नये. कोणी हिंदीत बोलल्यास मनसेने त्यांच्यावर दादागिरी करू नये, हे प्रकार थांबवावे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाही. महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी देखील एनडीएला पाठिंबा द्यावा. पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे, असे आठवले म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील ‘एनडीए’मधून बाहेर पडणार नाहीत. त्यांचा केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारला पाठिंबा कायम राहील. या संदर्भात माध्यमांतून होणा-या चर्चा निराधार असल्याचा दावाही राज्यमंत्री आठवले यांनी केला.