मुंबई : लोकसभेच्या मुंबईतील जागांसाठी आज शेवटची टोलवाटोलवी करण्याचा दिवस आहे. महायुती आणि मविआच्या एकाच दिवशी दोन मोठ्या सभा होत आहेत. मनसेने आरक्षित केलेल्या मैदानावर राज ठाकरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करण्याची शक्यता आहे.
तर बीकेसीच्या मैदानात महाविकास आघाडी मोदी, शाह, शिंदे आणि राज ठाकरेंवर टीका करण्याची शक्यता आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी मैदान अडविल्यावरून व भाजपला पाठिंबा दिल्यावरून टीका केली आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही दुकाने बंद होणार आहेत. त्यातील राज ठाकरे एक दुकान आहेत. तीन-चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होणार आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोणीही येऊ दे, जितक्या सभा घेतील तितक्या त्यांच्या सीट कमी होतील. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल सवाल उठवतात, त्यांच्याबरोबरच जातात, ही राज ठाकरे यांची खासियत आहे, अशी जहरी टीका राऊत यांनी केली.