22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात राज्यसभेची निवडणूक रंगतदार ठरणार!

राज्यात राज्यसभेची निवडणूक रंगतदार ठरणार!

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी १६ राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणा-या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून त्यासाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी होणारे मतदान हे खुले मतदान असल्याने पक्षादेश म्हणजे व्हीप महत्वाचा ठरणार आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यात बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी मतदान झाल्यास बरीच रंगत येणार आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भरत गोगावलेंचा व्हीप मानावा लागणार असल्याने ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीबाबतही अध्यक्षांचा निकाल आल्यानंतर हाच प्रश्न निर्माण होऊ शकतो.

जुलै २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने आघाडीची मते फोडून चौथा उमेदवार विजयी केला होता. या निवडणुकीत आघाडीच्या फुटीची बीजे पेरली गेली होती. त्यानंतरच्या विधान परिषद निवडणुकीत आघाडीचा पराभव निश्चित करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर आघाडी सरकारला आणि मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही तर या निवडणुकीत शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंचा पक्षादेश ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा एकच घटक असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या फुटीनंतर दोन्ही गटाची निवडणूक आयोग आणि विधिमंडळात लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने अजून निर्णय दिलेला नाही. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीआधी निवडणूक अयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मतांचे गणित जमवून मतदान केले होते. त्यामुळे विजयी उमेदवाराच्या अतिरिक्त मतांवर भाजपने चौथा उमेदवार निवडून आणला होता. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी अधिसूचना जारी होणार आहे. १५ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १६ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. या निवडणुकीत २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतीळ. तर २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होवून निकाल घोषित केले जातील. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषत: जांभळ््या रंगाचे स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादीची अडचण
काँग्रेसकडे स्वत:चे ४४ आमदार असल्याने त्यांची एक जागा निवडून येईल. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे १५ ते १६ आमदार तर शरद पवारांकडे ११ आमदार आहेत. दोघांनी मिळून एकच उमेदवार दिला तरी अतिरिक्त मते बाहेरून मिळवावी लागणार आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभा निवडणुकीत विजयाचे गणित जमविणे अवघड आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू झाल्यास ठाकरे गटाची कोंडी होणार आहे. सध्या कॉंग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेच्या अनिल देसाई यांचा कार्यकाल संपणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल
भाजप : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०, काँग्रेस : ४५, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३. एकूण २८७

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR