येवला (जि. नाशिक) : कर, भोगी आणि मकरसंक्रांत हे तीन दिवस जणू येवला शहरात अघोषित संचारबंदीच असते. ‘गल्ल्या ओस अन् गच्या फुल’, हे अनोखे दृश्यासाठी निमित्त ठरते ते पतंगोत्सवाचे.
यंदाही हटके ठरणा-या उत्सवासाठी येवलेकर सज्ज झाले आहेत.
येथील काही कारागीरांनी जगभर चर्चा असलेल्या अयोध्याचे राममंदिरासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रतिमाही पतंगावर उमटविल्याने त्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
तब्बल २५० वर्षांची परंपरा असलेल्या पतंगोत्सवाला येथील नवी पिढीही अधिक हर्षोल्हासाने साद घालत पुढे नेत आहे.
पतंगोत्सवाची झलक रविवार ते मंगळवारदरम्यान येथे पाहायला मिळणार आहे. बेधुंद होऊन सप्तरंगी पतंगाला भरारी देताना आकाशाला कवेत घेण्याचे दृश्य अवघ्या काही तासांनी दिसेल. मुस्लिमबांधवही या उत्सवात सहभागी होत आहेत.