अयोध्या : देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर रामलल्लाची ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे यावेळी रामलल्लाची विशेष पूजा करण्यात आली. रामलल्लाचा दिव्य राज्याभिषेक झाला तर झालाच पण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ते रामलल्लाचा ‘सूर्यतिलक’! दुपारी १२ वाजता रामलल्लाचे सूर्य तिलक करण्यात आले. खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामलल्लाच्या कपाळाच्या मधोमध पडल्याचे दिसून आले. ‘सूर्यतिलक’चा हा अनोखा आणि अद्भूत अनुभव देशभरातील सर्व रामभक्तांना याची देही, याची डोळा पाहता आले.
‘सूर्यतिलक’ मागचे ऑप्टोमेकॅनिकल तंत्रज्ञान…
– सूर्यकिरणे एका जागेतून प्रवेश करतील. ती या उपकरणाच्या लेन्सवर पडतील.
– तेथून ती परावर्तित करण्यात येतील. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा आरसा एका ठराविक कोनात बसविण्यात आला.
– तिस-या मजल्यावर शिखराजवळ ऑप्टोमेकॅनिकल यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेला ‘सूर्य तिलक’ नाव दिले आहे.
– सूर्यप्रकाश श्रीरामलल्लांच्या ललाटी आणण्यासाठी प्रकाशाचा मार्ग परावर्तित करण्यात आला. परावर्तित किरणे गाभा-यापर्यंत पोहोचवली.
– गाभा-याच्या बाहेर असलेल्या ठराविक कोनातील आरशामुळे तेथून सूर्यकिरणांनी परावर्तित होऊन श्रीरामलल्लाच्या कपाळाचा स्पर्श केला.