39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअमरावतीत रंगत वाढली

अमरावतीत रंगत वाढली

- आनंदराज आंबेडकरही मैदानात - पंचरंगी लढतीची शक्यता?

अमरावती : प्रतिनिधी
नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादामुळे सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. भाजपने २ दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर राणा यांनी रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर नाराज बच्चू कडू यांनी प्रहारच्या वतीने दिनेश बुब यांना रिंगणात उतरवण्याची घोषणा केली. येथे वंचितने आधीच उमेदवार जाहीर केला आहे. त्यातच आता रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे अमरावतीची लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

अमरावतीत अगोदरच भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीत नाराजी आहे. त्यातूनच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी राणा यांच्या उमेदवारीला विरोध करीत प्रहारचा उमेदवार मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच काँग्रेसचे बळवंत वानखडेही मैदानात आहेत. याशिवाय वंचितनेही प्राजक्ता तानकेश्वर यांना मैदानात उतरवले आहे. त्यातच आता आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केल्याने या मतदारसंघात रंगत वाढणार आहे.

यासंदर्भात आनंदराज आंबेडकर म्हणाले की, अमरावतीमधील सामान्य जनता, वेगळा विदर्भ संघटना आणि स्थानिक जनतेने आमच्या मतदारसंघात नवीन चेहरा वेगळा विचार घेऊन येऊ शकतो, असे मला सांगितले. त्यासाठी मला तिकडच्या अनेक लोकांनी फोन केले. त्यांनी मला लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची विनंती केली. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. २ मे रोजी मी अमरावतीमधून लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरणार आहे.

वंचितच्या कार्यकर्त्यांचा आग्रह : आंबेडकर
अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे आता आनंदराज आंबेडकर मैदानात उतरल्यास आंबेडकरी मतांची विभागणी होऊ शकते, अशी चर्चा आहे. दरम्यान, मला वंचितच्या कार्यकर्त्यांनीच अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR