18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रलोकसभेसाठी रणरागिणी मैदानात

लोकसभेसाठी रणरागिणी मैदानात

राज्यातील प्रमुख पक्षांकडून १४ महिलांना संधी

मुंबई : प्रतिनिधी
महिला सध्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्या जिथे जातील तिथे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही देशभरातील अनेक महिला उतरल्या आहेत. तर या निवडणुकीत महाराष्ट्रातील तब्बल १४ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

महाराष्ट्रातील ४८ पैकी १४ लोकसभा मतदारसंघांत प्रमुख पक्षांकडून १४ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील लोकसभेत देशभरातून ७८ महिला निवडून आल्या होत्या. २०१९ ला महाराष्ट्रातून ८ महिला खासदार निवडून गेल्या होत्या. यंदाच्या लोकसभेतही तो विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे.

पवार विरुद्ध पवार अशा बारामतीमधील लढतीकडे सर्वाधिक लक्ष वेधले आहे. सुप्रिया सुळे या सलग तीन वेळा लोकसभेत आहेत. तर सुनेत्रा पवार नवख्या असल्या तरी त्या अजित पवार यांच्या पत्नी, पवार घराण्याच्या सून व ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी म्हणून त्याही तगड्या उमेदवार मानल्या जातात. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून राजश्री पाटील या उभ्या आहेत. त्यांचे पती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचे राजकारण, त्यांचे स्वत:चे संभाषणकौशल्य, गोदावरी अर्बन बँक, गोदावरी स्कूल, महिला बचत गट व इतर सामाजिक कार्याचा मोठा पट त्यांच्यामागे उभा आहे. त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याशी आहे.

दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांना भाजपने दुस-यांदा उमेदवारी दिली आहे. पवार यांची लढत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांच्याशी होत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या उमेदवार आहेत. त्यांची लढत श्रीकांत शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार मतदारसंघातून डॉ. हीना गावित या तिस-यांदा भाजपकडून आपले नशीब आजमावत आहेत. पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता त्यांना उमेदवारी मिळाली आहे. धुळे मतदारसंघातून कॉँग्रेसच्या माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

जळगावात स्मिता वाघ या भाजपकडून लढत आहेत. तर रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे या उमेदवार आहेत. त्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. अमरावती मतदारसंघातून भाजपच्या वतीने खासदार नवनीत राणा उमेदवार आहेत. गेल्यावेळी त्या अपक्ष म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लोकसभेत पोहोचल्या होत्या. त्यांचा बनावट जातप्रमाणपत्राचा मुद्दाही खूप गाजला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरविल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
बीड मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांची लढत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे. त्यांचे पती दिवंगत सुरेश धानोरकर हे या मतदारसंघाचे खासदार होते. प्रतिभा धानोरकर या वरोरा-भद्रावतीच्या आमदार आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. त्यांची लढत भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्याशी आहे. उस्मानाबाद-धाराशिव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्चना पाटील निवडणूक लढवत असून त्यांची लढत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी आहे. त्यामुळे राज्यात महिला उमेदवार चुरशीची लढत देणार असून यांच्यापैकी किती उमेदवारांना मतदार लोकसभेत जाण्याची संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR