अहमदाबाद – गुजरातच्या हायकोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. बलात्कार हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे पतीने केला असला तरी तो गुन्हाच आहे, असे म्हणत हायकोर्टाने वैवाहिक बलात्कारावर भाष्य केले. जगातील अनेक देशांमध्ये वैवाहिक बलात्कारावर बंदी असल्याचे कोर्टाने नमूद केले. कोर्टाने महिलेची याचिका फेटाळून लावली आहे. मुलाने त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी मुलाच्या आईने कोर्टात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती दिवेश जोशी म्हणाले की, पुरुष हा पुरुष असतो. कृत्य हे कृत्य असते. बलात्कार हा बलात्कार असतो. त्यामुळे तो पुरुषाने केलेला असो किंवा पतीने पत्नीवर केलेला असो.
सध्याच्या भारतीय दंड संहितेनुसार, पत्नीसोबतचा बळजबरी शारीरिक संबंध गुन्ह्याच्या व्याख्येतून वगळण्यात आला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित आहेत. या कायद्याला आव्हान देण्यात आले आहे. दिल्लीच्या विभाजीत निर्णयाबाबतही सर्वोच्च कोर्टाने निकाल देणे अद्याप बाकी आहे.
मार्च २०२२ मध्ये कर्नाटक हायकोर्टाने पतीने पत्नीवर केलेला बलात्कार गुन्हेगारी कृत्य ठरवले होते. त्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने याविरोधात पतीच्या बाजूने नोव्हेंबरमध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावरही सुप्रीम कोर्टाने निकाल देणे बाकी आहे. त्यामुळे गुजरात हायकोर्टाने केलेली टिप्पणी महत्त्वाची मानली जात आहे.
न्यायमूर्ती जोशी म्हणाले की, वैवाहिक बलात्कार अमेरिकेच्या ५० राज्यांत गुन्हा आहे. ३ ऑस्ट्रेलियातील राज्ये, न्यूझिलंड, कॅनडा, इस्रायल, फ्रान्स, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, पोलंडसह इतर काही देशांमध्ये पतीने पत्नीवर केलेली लैंगिक बळजबरी हा गुन्हा आहे. दरम्यान, ऑगस्ट २०२३ मध्ये राजकोटमध्ये एका महिलेने आपल्या पतीविरोधात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती.