मुंबई : रतन टाटा यांना गुरूवार दि. १० ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, रतन टाटा यांच्या रुपानं आपण एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. देशाच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाज उभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना उच्च प्रतीची नैतिक मूल्ये पाळली. कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.