धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे शारदीय नवरात्र महोत्सवास ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे.आज ७ ऑक्टोबर रोजी महोत्सवाच्या पाचव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींच्या नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली. भगवान सुर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री तुळजाभवानी मातेस दिला. याप्रमाणे रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते,अशी आख्यायिका सांगितली जाते.
दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने विधीवत पूर्ण केले जातात. ८ ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार महापूजा,९ ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा,१० ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.
काल रविवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री चौथ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीजींना वस्त्र अलंकार चढविण्यात आले.त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात घोडा वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली. रविवार असल्यामुळे असंख्य भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.