मुंबई : प्रतिनिधी
भाजपचे नवे संघटन पर्व प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. याद्वारे भाजपाच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांचा नव्या मंत्रीमंडळात समावेश झालेला नाही. रवींद्र चव्हाण यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ही नियुक्ती या दिशेनेच महत्वाचे पाउल असल्याचे मानण्यात येत आहे.
रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीतून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०२१ मध्ये शिंदे-फडणवीस सरकार येताना सत्तापालटात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यावेळी त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देण्यात आले होते. पालघर तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. ठाणे, पालघर, सिंधुदुर्गमध्ये त्यांनी पक्षासाठी दमदार कामगिरी करत पक्षाच्या जागा निवडून आणण्यात मोठे योगदान दिले आहे. उदधव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणा-या कोकणात चव्हाण यांनी मुसंडी मारत पक्षाला यश मिळवून दिले.
मात्र आता विधानसभेत दणदणीत यश मिळवत महायुतीचे सरकार स्थापन झाले. तेव्हा रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूलमंत्री हे महत्वाचे मंत्रीपद देण्यात आले. तेव्हाच रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार याची चर्चा सुरू झाली. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटन पर्व प्रदेश प्रभारी या महत्वाच्या पदावर रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चव्हाण यांना आता प्रदेशाध्यक्षपद कधी मिळते हे पहावे लागणार आहे. येत्या १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे भाजपाचे प्रदेश अधिवेशन आहे. या अधिवेशनात चव्हाण यांच्या नियुक्तीची घोषणा होउ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वाच्या निवडणूका होणार आहेत. आताच जर चव्हाण यांची नियुक्ती झाली तर त्यांना तयारीला पुरेसा वेळ मिळू शकतो.