नवी दिल्ली : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चांना बळ देणारे वृत्त समोर आले आहे. जडेजाने प्राथमिक सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश केला आहे. त्याची पत्नी रिवाबा जडेजा देखील भाजपच्या सदस्य आहे आणि गुजरातच्या जामनगर मतदारसंघातून पक्षाच्या आमदार आहे. तिने सोशल मीडियावर रवींद्र जडेजाच्या प्राथमिक सदस्यत्वाची माहिती पोस्ट केली आहे.
रवींद्र जडेजाने दुलीप करंडक स्पर्धेतून नुकतीच माघार घेतली होती आणि त्याच्या कसोटी संघातील समावेशावरही प्रश्नचिन्ह आहे. अशात रवींद्र जडेजा राजकारणाच्या मैदानावर उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्याची पत्नी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली आहे. तिच्या प्रचारासाठी रवींद्र जडेजाही मैदानात उतरल्याचे पाहिले होते. रिवाबाने माध्यमांना सांगितले की, सदस्यत्व मोहिमेची सुरुवात मी माझ्या घरापासून केली आहे. काल भाजपने सदस्यत्व मोहिमेचा एक भाग म्हणून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही मोहीम भाजप शहर व जिल्ह्याच्या वतीने राबविण्यात आली होती.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रवींद्र जडेजाही विश्रांतीवर आहे. तो दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळेल असे वाटले होते आणि त्याचे संघात नावही होते. परंतु त्याने अचाकन माघार घेतली. जडेजाने ७२ कसोटी सामन्यांमध्ये ३०३६ धावा केल्या आहेत, तर २९४ विकेट्स घेतल्या आहेत. १९७ वनव डे सामन्यांत २७५६ धावा व २२० विकेट्स त्याच्या नावावर आहेत. ७४ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने ५१५ धावा केल्या आहेत आणि ५४ बळी घेतले आहेत.