मुंबई : मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स रिटेलने मोठी डील केली आहे. रिलायन्स रिटेलच्या कंपनीने ८२ वर्ष जुन्या रावळगाव शुगर फार्मच्या कॉफी ब्रेक आणि पान पसंद यांसारख्या ब्रँडचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. रावळगाव शुगर फार्म्सकडे मँगो मूड, कॉफी ब्रेक, टुटी फ्रूटी, पान पसंद, चोको क्रीम आणि सुप्रीम यांसारखे ब्रँड आहेत.
आता या कंपनीने या उत्पादनांचे ट्रेडमार्क, उत्पादनांची रेसिपी आणि सर्व इंटेलॅक्चुअल प्रॉपर्टी राईट्स रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला या डील अंतर्गत विकण्यात आले आहेत. आरसीपीएल ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची उपकंपनी आहे, जी रिलायन्स ग्रुपचे रिटेल युनिट आहे.
रावळगाव शुगर फार्म्सने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. संचालक मंडळाने या ब्रँडचे ट्रेडमार्क आणि सर्व इंटेलॅक्चुअल प्रॉपर्टी राईट्स आरसीपीएल २७ कोटी रुपयांच्या व्यवहारात विक्री आणि हस्तांतरित करण्यास मान्यता दिल्याचे कंपनीने म्हटले.