मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली. त्यात काँग्रेसकडूनही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. दरम्यान, महाविकास आघाडीमधील मतभेद मिटवून ऐक्य टिकविण्यासाठी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत मोठा निर्णय घेतला.
महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, कुठे उमेदवारी अर्ज भरले असतील त्यांनी ते मागे घेतले पाहिजेत, असे स्पष्ट आदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काँग्रेसच्या बंडखोरांना दिले. आमच्याकडून जे कुणी बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे अर्ज उद्या मागे घेण्यात येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आम्ही केवळ हायकमांडने घोषित केलेल्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. जिथे कुठे मतभेद असतील ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड सोडवण्याचे प्रयत्न करतील, असेही चेन्निथला यांनी सांगितले.