31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रनोव्हेंबर महिन्यात एसटीला विक्रमी धनलाभ

नोव्हेंबर महिन्यात एसटीला विक्रमी धनलाभ

९१५ कोटींचे उत्पन्न

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाची एसटी गावागावांत आणि शहराशहरांत पोहोचली आहे. काळाप्रमाणे एसटी बदलत चालली आहे. एसटीचा प्रवास अधिक आरामदायी होण्यासाठी परिवहन महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी अधिक सुविधा दिल्या जात आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढत आहे. विविध सवलती दिल्यानंतरही नोव्हेंबर महिन्यात एसटीने उत्पन्नाचा विक्रम केला आहे. एकाच महिन्यात ९१५ कोटींचे उत्पन्न एसटीला मिळाले आहे.

गेल्या १९ महिन्यांपैकी यंदाचा नोव्हेंबर महिना एसटीसाठी सर्वाधिक फायद्याचा ठरला आहे. या महिन्यात दिवाळीच्या सुट्यांमुळे एसटीच्या तिजोरीत ९१५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या महिन्यात महामंडळाने भाडेवाढ केली होती. दिवाळीमुळे एसटीने दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सुटीच्या कालावधीत लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी वाहतूक एसटीने वाढवली होती. जादा बसेस सोडल्या होत्या. या काळात एसटीच्या ताफ्यात नव्या गाड्याही आल्या होत्या. यामुळे नोव्हेंबर महिन्यात एसटीचे रोजचे सरासरी उत्पन्न ३० कोटींपेक्षा जास्त झाले आहे. एसटीने आता क्यूआर कोडची सुविधाही सुरू केली आहे. यामुळे खिशात पैसे नसतानाही एसटी प्रवास करता येणार आहे.

एसटीत अनेक सवलती
एसटीमध्ये सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५० टक्के सूट दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते. ज्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा आहे. सामाजिक जाणीव लक्षात घेऊन दिव्यांग व्यक्तींना एसटी प्रवासात सवलत आहे. पत्रकारांनाही एसटी प्रवासात सवलत दिली जाते. विविध सवलती देऊनही एसटीने उत्पन्नाचा विक्रमी टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठांना मोफत प्रवासाच्या या सवलती सर्व सेवांसोबतच शिवनेरी बससेवेसाठी देखील लागू असणार आहेत. यामुळे राज्यभरातील लाखो लोकांना फायदा झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR