31.7 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeसोलापूरसोलापुरात होणार एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय

सोलापुरात होणार एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय

सोलापूर : राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यासह सात ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यात सातारा, सोलापूर, बारामती, अहमदनगर, जळगाव, अकोला व चंद्रपूर या शहरांचा समावेश आहे. याबाबत शासनाने आदेश काढला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची सात प्रादेशिक कार्यालये स्थापन झाल्याने त्याचा फायदा औद्योगिक क्षेत्राला होणार आहे. उद्योजकांच्या समस्या जागेवरच सुटण्यास मदत होणार आहे. या कार्यालयांसाठी ९२ नवीन पदेनिर्मितीसही शासनाने मान्यता दिली आहे. येत्या दहा महिन्यांच्या आत वित्त विभागाकडून पदमान्यता घेऊन मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. यात प्रादेशिक अधिकारी, व्यवस्थापक (प्रादेशिक अधिकारी समकक्ष पदे), क्षेत्र व्यवस्थापक, उपरचनाकार, प्रमुख भूमापक, सहायक क्षेत्र व्यवस्थापक, लिपिक टंकलेखक, वाहनचालक, शिपाई, अशी पदनिर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील प्रादेशिक कार्यालयाची संख्या वाढत्या औद्योगिकरणाच्या तुलनेत कमी आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात त्याअनुषंगाने कामकाजात वाढत्या औद्योगिकरणामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

अनेक ठिकाणी दोन-तीन जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एकच प्रादेशिक कार्यालय असल्याने त्या भागातील उद्योजकांना प्रादेशिक कार्यालयातील कामकाजाकरिता नाहक दूर अंतरापर्यंतचा प्रवास करावा लागतो. उद्योग विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखालील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सात प्रादेशिक कार्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे आता उद्योजकांना दूरचा प्रवास करावा लागणार नाही.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR