मुंबई : अभिनेता सलमान खान याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अनुज थापनच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात सलमानचा कुठलाही संबंध दिसून येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकेतील प्रतिवादी म्हणून असलेले सलमानचे नाव वगळण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले.
सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबारप्रकरणी अनुज थापनला पोलिसांनी अटक केली होती. त्याने पोलिस कोठडीत असतानाच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. तेथून त्याला रुग्णालयात हलवले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनुजला कोठडीत पोलिसांनी मारहाण केली, असा आरोप करीत त्याची आई रिटा देवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
अनुजच्या कोठडीतील मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली असून या याचिकेवर सोमवारी (ता. १०) न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी खंडपीठाने रिटा देवी यांना याचिकेतील सलमान खानचे नाव वगळण्याचे निर्देश दिले.