25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयअपहरण केलेल्या जहाजातील १७ क्रू मेंबर्सची सुटका

अपहरण केलेल्या जहाजातील १७ क्रू मेंबर्सची सुटका

नवी दिल्ली : ११० दिवसांपेक्षा अधिक वेळ एडनच्या आखातात हायजॅक केलेल्या व्यापारी जहाज रुएनला वाचविण्याचे ऑपरेशन भारतीय नौदलाने पूर्ण केले आहे. हे ऑपरेशन भारतीय किनारपट्टीपासून २६०० किमी इतक्या दूर अंतरावर करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये ३५ सोमालियन समुद्री चाच्यांना (लुटेरे) ताब्यात घेण्यात आले असून १७ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या कारवाईतून हिंद महासागरात शांतता आणि स्थिरता मजबूत करण्याचा आणि चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडण्याचा नौदलाचा निर्धार दिसून येतो. या जहाजात अंदाजे ३७ हजार टन माल भरलेला असून त्याची किंमत १० लाख अमेरिकन डॉलर (८.२ कोटी रुपये) आहे.

या जहाजाला भारतात सुरक्षितपणे आणण्यात येणार आहे. येमेनच्या हौथी बंडखोरांकडून लाल समुद्रातील मालवाहू जहाजांवर वाढत्या हल्ल्यांनंतर नौदलाने जलमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी १० हून अधिक युद्धनौका तैनात केल्या आहेत. आयएनएस कोलकाता, आयएनएस सुभद्रा आणि सी गार्डियन ड्रोन या ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आले होते. ऑपरेशनसाठी सी-१७ विमानातून खास मार्कोस कमांडोज उतरविण्यात आले होते. अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, त्यांनी हौथी नियंत्रित प्रदेशात पाच ड्रोन नौका आणि एक ड्रोन नष्ट केले. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.

भारतीय युद्धनौकेवर गोळीबार
नौदलाने सांगितले की, आयएनएस कोलकाताने बुधवारी सकाळी रुएनला रोखले आणि ड्रोनद्वारे जहाजावर असलेल्या सशस्त्र चाच्यांच्या उपस्थितीची खात्री केली. चाच्यांनी ड्रोन खाली पाडले आणि भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर गोळीबार केला. आयएनएस कोलकाताने जहाजाची स्टिअरिंग सिस्टीम आणि नेव्हिगेशनल मदतीला ठप्प करत तिची हालचाल बंद पाडली. यानंतर सी-१७ विमानातून मार्कोस कमांडोज खाली उतरले आणि जहाज ताब्यात घेतले.

बंडखोरांचा आणखी एका जहाजावर हल्ला
येमेनच्या हौथी बंडखोरांनी रविवारी पहाटे एडनच्या आखातात आणखी एका जहाजाला लक्ष्य केले. लाल समुद्राकडे जाणा-या महत्त्वाच्या जलमार्गावरील जहाजांना हौथी बंडखोर टार्गेट करत असून यामुळे जगभरातील व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. एडन हे दक्षिण येमेनमधील एक शहर असून येथे देशातील निर्वासितांचे सरकार आहे. हौथी बंडखोरांनी या भागात वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यामुळे एडनच्या आखातातून इंधन आणि इतर मालवाहू जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR