22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार

देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राम मंदिराच्या निर्मितीने देशात नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

२२ जानेवारीकरता आदेशाची आवश्यकता नाही, इतका प्रचंड जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये आहे. हा उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत आहे, कारण जवळपास ५०० ते ६०० वर्षे जो संघर्ष चालला, त्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रामलल्ला हे त्यांच्या प्रत्यक्ष जन्मस्थानी स्थापित होत आहेत. मला विश्वास आहे की त्यांची स्थापना एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल. एक आत्मनिर्भर, आत्मअभिमानी असा स्वाभिमानी भारत आपल्याला त्या दिवसापासून निश्चितच पहायला मिळेल. म्हणून आम्ही सगळे देखील अत्यंत उत्कंठेने त्या दिवसाची वाट पाहत आहोत.

सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नियमानुसार जेव्हा दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होते, त्यावेळी ती शिक्षा लागू झाल्यापासून ती आमदारकी रद्द होते असा कायदा आहे. जर या आदेशाला स्थगिती मिळाली तर आमदारकी वाचते, अन्यथा ती आमदारकी जाते. त्यामुळे त्यात काही वेगळे होण्याचे कारण नाही. त्यामुळे जे काही होईल ते कायद्याप्रमाणे होईल.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २० जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, हे सरकार अतिशय सकारात्मकतेने काम करत आहे. मुख्यमंत्री हे स्वत: या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून आहेत. आज राज्य मागास आयोगाने वेगाने काम सुरू केले आहे. शिंदे समितीने दुसरा अहवाल सादर केला असून तिसरा अहवालही लवकरच अपेक्षित आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन नोंदी या हैदराबादमधून आम्ही प्राप्त करून घेत आहोत. राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे राज्य सरकार योग्य काम करत आहे, हे लक्षात आल्यानंतर तसा निर्णय तो घेणार नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR