22.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्र७ फेब्रुवारीपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार

७ फेब्रुवारीपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार

छ. संभाजीनगर : आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने निवासी डॉक्टरांकडून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. अनेकदा पाठपुरावा करून देखील सरकार आश्वासनांच्या पलीकडे कोणतीही कार्यवाही करत नसल्याने राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी डॉक्टर देखील या संपात सहभागी होणार असून, याबाबत त्यांच्याकडून अधिकृत पत्रक देखील काढण्यात आले आहे.

निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. गेल्या एक वर्षभरात मध्यवर्ती मार्ड संघटनेने अनेकवेळा यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला. पण प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजर हे प्रशासनाकडून दाखवण्यात आले. प्रत्यक्षात कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्यवर्ती मार्ड संघटनेने ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथील सर्व निवासी डॉक्टर हे संपाची भूमिका घेतील. संपामुळे होणा-या रुग्णसेवेवरील परिणामासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आणि संपाच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात येतील, असे निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

संपावर जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही…
यावेळी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवासी डॉक्टरांना दिले जाणारे त्यांचे हक्काचे विद्यावेतन हे त्यांना कधीही वेळेवर देण्यात आलेले नाही. अनेक महिन्यांसाठी विद्यावेतन थकित असल्यामुळे, निवासी डॉक्टरांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेल्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे दोन-तीन डॉक्टरांना एकाच खोलीत अत्यंत अडचणीत राहावे लागत आहे. आम्ही आमच्या मागण्या वेळोवेळी प्रशासनापुढे मांडल्या असून, प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त तोंडी आश्वासनाचे गाजर दाखवण्यात आले. प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळे आमच्यापुढे संपावर जाण्याखेरीज दुसरा पर्याय दिसून येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR