22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeसोलापूरप्रलंबित प्रश्न सोडवा, शिक्षक समितीने केली जिल्हा परिषदेकडे मागणी

प्रलंबित प्रश्न सोडवा, शिक्षक समितीने केली जिल्हा परिषदेकडे मागणी

सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची तत्परतेने सोडवणूक व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाकडे केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे काही प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहेत.

या प्रश्नांची दखल घेऊन ते तत्काळ मार्गी लागावेत यादृष्टीने आदेश व्हावेत, अशी विनंती या निवेदनात केली आहे. यामध्ये मुख्यत्वे आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना वेतनवाढीचा लाभ मिळावा, रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, भाषा विषय शिक्षकांचे समायोजन त्वरित व्हावे, बी. एस्सी. अर्हताधारक विज्ञान विषय शिक्षकांना वेतन श्रेणीचा लाभ मिळावा,

शालार्थ वेतन प्रणालीद्वारे थकीत व पुरवणी देयके तत्काळ अदा करावीत, कन्नड माध्यमाच्या पदावनत केलेल्या मुख्याध्यापकांना पात्र शाळांवर पदस्थापना द्यावी, संच मान्यतेतील त्रुटी दुरुस्त करुन फेरप्रस्ताव सादर करावा, तालुका स्तरावरील तीन वर्षांपासून रखडलेल्या शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करुन द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्याचे जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर यांनी सांगितले.

यावेळी राजन सावंत, डॉ. रंगनाथ काकडे, अनिल बंडगर, मो. बा. शेख यांनी जिल्हा शाखेसाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हा शाखा पदाधिकारी निवडीची पत्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी प्रताप रुपनवर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी जिल्ह्यातील निवेदनात नमूद प्रश्नांबाबतही प्रत्येक बाबींवर तपशीलवार सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शिष्टमंडळात जिल्हा नेते संतोष हुमनाबादकर, कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, बसवराज गुरव, अमोल राऊत, गजानन लिगाडे, बाबासाहेब माने, अन्वर मकानदार, सचिन क्षीरसागर, दिनकर शिंदे, किशोर बगाडे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR