मुंबई : भारताच्या आशेचा किरण, दिग्गज महिला कुस्तीपटू आणि मागील काही दिवसांपासून तमाम भारतीयांच्या ओठावर असलेले नाव म्हणजे विनेश फोगाट. विनेश फोगाटने ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठल्याने एक पदक निश्चित झाले होते. पण, त्याच्या पुढच्या काही तासातच भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा करणारी बातमी समोर आली. विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र असल्याचे जाहीर झाले. तिचे वजन अतिरिक्त असल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. विनेश अपात्र घोषित होताच विविध क्षेत्रातील दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली, काहींनी संताप तर अनेकांनी नाना प्रश्न उपस्थित केले. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याप्रकरणी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
सचिनने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, अम्पायर्स कॉलचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक खेळाचे काही नियम ठरलेले असतात आणि ते नियम त्या त्या परिस्थितीच्या संदर्भाने पाहिले जाणे आवश्यक आहे. काही वेळा या नियमांचा पुनर्विचारही करायला हवा. नियमांचे पालन करून विनेश फोगाट अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. पण, फायनलच्या आधी वजनामुळे ती अपात्र झाली. म्हणून तिचे रौप्य पदक हिसकावून घेणे हे अशोभनीय आहे आणि लॉजिक व खेळभावनेच्या विरोधात आहे.
तसेच ताकद वाढावी या हेतूने ड्रग्जसारख्या औषधांचा वापर केला असता आणि नैतिक उल्लंघनासाठी खेळाडूला अपात्र ठरवले गेले असते तर ते समजण्यासारखे होते. असे असते तर कोणतेही पदक न देणे आणि शेवटचे स्थान देणे योग्य ठरेल. मात्र, विनेशने तिच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरी गाठली होती. ती नक्कीच रौप्य पदकासाठी पात्र आहे. आपण सर्वजण न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. विनेशला ती ज्यासाठी पात्र आहे असा योग्य सन्मान मिळावा, अशी आशा करूया आणि प्रार्थना करूया, असेही सचिनने नमूद केले.