ढाका : सरकारी नोक-यांमध्ये ३० टक्के आरक्षणाविरोधात बांगलादेशात सध्या प्रचंड आंदोलने होत आहेत. या आंदोलनात आतापर्यंत १०५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून सरकारने देशात संचारबंदी लागू केली असून लष्कर तैनात केले आहे. बांगलादेशातील कर्फ्यूची घोषणा सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर यांनी केली.
शुक्रवारी राजधानी ढाका येथे पोलिस आणि सुरक्षा अधिका-यांनी गोळीबार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि राजधानी ढाकामधील सर्व मेळाव्यांवर बंदी घातल्यानंतर काही तासांमध्ये कर्फ्यू लादण्याचा निर्णय घेतला.
आंदोलकांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जे सार्वजनिक क्षेत्रातील नोक-यांमध्ये आरक्षणाच्या व्यवस्थेविरोधात ढाका आणि इतर शहरांमध्ये आंदोलन करत आहेत. या आरक्षणांतर्गत १९७१ मध्ये पाकिस्तानपासून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या युद्धवीरांच्या नातेवाईकांना आरक्षण दिले जाते, त्या विरोधात देशातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.