30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी लष्करी जवानांची लुटमार गँग

माजी लष्करी जवानांची लुटमार गँग

नाशिक : धारदार हत्याराचा धाक दाखवून आणि डोळ्यात मिरचीपूड फेकून सोन्या-चांदीचे दागिने पोहोचवणा-या कुरिअर व्हॅनचालकाला लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चोरट्यांच्या या गँगने तब्बल ४ कोटी रुपयांचे दागिने लुटले होते. अखेर या टोळीतील चार जणांना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.

या लुटमारीतील तिघे अजून फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस अजून आग्रा येथे तळ ठोकून आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे या टोळीत माजी लष्करी जवानांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या टोळीकडून १ ते दीड कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

गेल्या आठवड्यात बई आग्रा महामार्गावरील माणिकखांब गावाजवळ घोटी पोलिस ठाणे हद्दीत चोरीची ही घटना घडली होती. मुंबईच्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेसच्या इको गाडीवर दरोडा घालण्यात आला. दोन वेगवेगळ्या कारमधून आलेल्या ५ ते ६ जणांनी ती गाडी लुटली होती. लुटलेल्या वाहनास एकाने पुढून तर एकाने मागून कार आडवी लावून वाहन अडवले होते.

या दरोडेखोरांनी गाडीतील सर्वांना खाली उतरवून हत्याराचा धाक दाखवला आणि त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून त्यांना जायबंदी केले. त्यानंतर त्या व्हॅनमधील सुमारे ४ कोटी रुपये किमतीचे सोनं-चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाले. याप्रकरणी कारचालक गोपालकुमार अशोककुमार रा. किरावली, आग्रा यांनी फिर्याद दाखल केली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR