22.9 C
Latur
Friday, July 26, 2024
Homeमहाराष्ट्रआगामी काळात रोबोटिक कवींचा होणार सहभाग

आगामी काळात रोबोटिक कवींचा होणार सहभाग

अमळनेर :
आगामी काही वर्षांनी होणा-या साहित्य संमेलनात एआय कट्टा (कृत्रिम बुद्धिमत्ता) असेल. त्यात रोबोटिक कवी, कवयित्री सहभागी होतील. भविष्यात सकस साहित्य उत्पन्न करू शकलो तर तंत्रज्ञान उपयोगी ठरेल. ज्यामुळे सामान्यांचे हित होत असेल त्यास साहित्य मानावे, असा सूर ‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य’ या परिसंवादात उमटला.

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‘वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी साहित्य’ या विषयावर परिसंवाद झाला. नॅशनल बूक ट्रस्ट अध्यक्ष मिलिंद मराठे अध्यक्षपदी होते. दीपक शिकारपूर,नम्रता फलके, मिलिंद कीर्ती, सागर जावडेकर, संदीप माळी यांनी परिसंवादात सहभाग घेतला.

शिकारपूर म्हणाले, आयुष्यात ऐटीत जगायचे असेल तर आयटी वापरावे. इंटरनेट तंत्रज्ञानात रिचला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातून इतिहास व भूगोल जमा झाला आहे. लवकरच आभासी साहित्य संमेलन होईल, असा आशावाद व्यक्त केला. मेटाव्हर्स हे एक प्रभावी तंत्रज्ञान आहे. लॉकडाऊन काळात हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले. आगामी ७-८ वर्षांनी होणा-या साहित्य संमेलनात एआय कट्टा असेल. त्यात रोबोटिक कवी, कवयित्री सहभागी होतील, असा आशावाद मांडला. कृत्रिम बुद्धिमत्तेचे सकारात्मक व नकारात्मक पैलू असल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञानाला शत्रू मानू नका, त्यास स्नेही मानावे.

फलके म्हणाले की, भरत स्वतंत्र झाला. भारतात तंत्रज्ञान हळूहळू येत गेले. याचे चित्रण ग्रामीण कादंबरीत आले. ललित साहित्यात जयंत नारळीकर यांनी यंत्रमानव व मानव यांच्या भावविश्वाचे चित्रण केले आहे. आज पुस्तक चार फॉरमॅटमध्ये येते. जसे हार्ड, सॉफ्ट, ऑडिओ, व्हिज्वल आहे. अरुण काळे यांचा मागून आलेले लोक हा काव्यसंग्रह, राहुल बनसोडे यांनी भावनिक गुंतागुंत उलगडली आहे. पटेली यांनी ऑनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून १ हजार पुस्तकांची विक्री केली.

कीर्ती म्हणाले भारताचा पाचवी डिजिटल महासत्ता म्हणून उदय होत आहे. मोबाईलचा वापर करणारे लोक हे लेखक बनले आहेत. कोणीही लिहू शकतो, प्रसिद्ध करू शकतो. एआयमुळे यंत्रे बोलू व चालू लागली आहेत. ही यंत्रे तुमच्यावर पाळत ठेवून आहेत. सृजनशीलता कमी होत आहे. तंत्रज्ञान मोफत मिळत असल्याने त्याची भुरळ पडली आहे.

जावडेकर म्हणाले की, भाषा हा एकमेकांना जोडणारा पूल आहे. अनेक क्षेत्रात वेबसाईट निर्माण होत आहे. आयटी क्षेत्र वरदान ठरत असताना त्याचा दुरुपयोग केला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
माळी म्हणाले, तंत्रज्ञामुळे साहित्यात बदल होत आहे. वाचक, लेखक यांची संख्या वाढत आहे. वर्तमानपत्रात आपले साहित्य छापून आणण्याचा विचार मागे पडत आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध होणा-या साहित्याचा दर्जा त्याला मिळणा-या कमेंट, लाईक, व् ूजवरून ठरविले जात आहे.

अध्यक्षीय भाषणात मराठे म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे रोजगारनिर्मिती होत आहे. जगाच्या सुरुवातीपासून नवीन तंत्रज्ञानाला विरोध करण्यात येतो. हा लढा सतत चालणारा आहे. तंत्रज्ञानाचा वेग वाढला आहे. तंत्रज्ञान सर्वांकुश झाले आहे. ऑडिओ बुक ऐकताना केवळ सूरातील चढ-उताराकडे लक्ष दिले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR