कटक : वृत्तसंस्था
कटक येथे रविवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात षटकारासह रोहित शर्माने धावांचा दुष्काळ संपवत झंझावाती शतक झळकावले. रोहित शर्माने अवघ्या ७६ चेंडूत ७ षटकार आणि ९ चौकारांसह १०१ धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माचे हे वनडे क्रिकेटमधील ३२ वे शतक आहे तर वनडेमधील दुसरे सर्वांत जलद शतक ठरले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्मा फार्मात आल्याने टीम इंडियासाठी आनंदाची बातमी ठरली आहे.
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३३८ दिवसांनी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४७५ दिवसांनंतर शतक झळकावले. रोहित शर्मा डावाच्या सुरूवातीपासूनच चांगल्या फार्मात होता. त्याने अवघ्या ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज रोहितने प्रत्येक गोलंदाजाची चांगलीच शाळा घेत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. मागच्या काही दिवसांपासून रोहित फार्मसाठी झगडत होता.
पण आज कटकमध्ये तो वेगळ््याच अंदाजात होता. या सामन्यात रोहितने ३ डॉट बॉल्स खेळल्यानंतर चौकारासह आपल्या डावाची सुरुवात केली. पुढच्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्याने जोरदार फटकेबाजी करीत ७५ चेंडूत ६ षटकार आणि ९चौकारांच्या मदतीने ९६ धावा केल्या. यानंतर त्याने २६ व्या षटकात आदिल रशीदच्या चेंडूवर षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले.