31 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरलातूर शहराचा पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेसाठी ५६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

लातूर शहराचा पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेसाठी ५६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

लातूर : प्रतिनिधी

अत्यंत गतीने विकसित होत असलेल्या लातूर शहराची वाढती गरज लक्षात घेऊन मांजरा धरणापासून समांतर जलवाहिनीद्वारे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी २५९.२२ कोटी रुपये तर शहरातील भूमिगत गटार बांधणीसाठी ३०५.१९ कोटी रुपये असे जवळपास ५६५ कोटी रुपये खर्चाची पहिल्या टप्प्याची योजना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून मंजूर झाली आहे. एकूण योजना जवळपास १२६५ कोटीची असून दुस-या टप्प्यात या योजनांसाठी आणखी जवळपास ७०० कोटी रुपये मिळणार आहेत.

लातूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आगामी सन २०५५ पर्यंतचा विचार करुन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर महानगरपालिकेने शहर पाणीपुरवयासाठी ५५० कोटी रुपये खर्चाची योजना अमृत योजनेअंतर्गत शासनाकडे सादर केली होती, यात मांजरा धरणावर स्वतंत्र नव्याने पंप हाऊस उभारण्यापासून लातूरपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा समावेश आहे, सन २००४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून मांजरा धरणातून थेट पाईपलाईनद्वारे लातूरला पाणी आणण्याची योजना राबवण्यात आलेली आहे, या योजनेला आता जवळपास २० वर्षे पूर्ण होत आली आहेत. दरम्यानच्या काळात लातूर शहराच्या विस्ताराबरोबर लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सदरील बाब लक्षात घेऊन आगामी २०५५ पर्यंतचा शहरवाढीचा विचार करुन आमदार अमित देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते पालकमंत्री असताना शहर पाणीपुरवठ्यासाठी नव्याने योजना आखण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५५० कोटी रुपये खर्चाची योजना तयार करुन शासनाकडे सादर करण्यात आली होती, या योजनेतील पहिला टप्प्याला म्हणजे २५९.२२ कोटी रुपये खर्चाच्या योजनेला शासनाने आता मंजुरी दिली आहे.

लातूर शहराचा वाढलेला विस्तार नव्याने निर्माण झालेल्या वस्त्या आणि आगामी काळात होणारा शहराचा विस्तार लक्षात घेऊन लातूर शहरात भूमिगत गटार योजना राबवण्यासाठी ७०० कोटी रुपये खर्चाची योजना आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली आहे, या योजनेतीलही पहिला टप्प्याला म्हणजे ३०५.१९ कोटी रुपये खर्चाच्या योजनेला शासनाने आता मंजुरी दिलेली आहे, दोन्ही योजनेच्या दुस-या टप्प्यातील कामाला पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर मंजुरी मिळणार आहे, दोन्ही योजनांच्या दुस-या टप्प्यातील कामासाठी आणखी जवळपास ७०० कोटी रुपये मिळणार आहेत, सदरील योजनेचे प्रस्ताव तयार झाल्यापासून आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रत्येक टप्प्यावर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा आणि विनंती केली आहे. सदरील योजनांसाठी पहिला टप्प्यात जवळपास ५६५ कोटी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR