21.2 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रआरक्षणाला आरएसएसचाच विरोध

आरक्षणाला आरएसएसचाच विरोध

मुंबई : अमेरिकेतील एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील आरक्षण संपविण्याविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले. याच विधानावरून भाजप आक्रमक झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली. भाजपच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत म्हणाले, विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा विपर्यास करून भारतीय जनता पक्ष फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. आरक्षणाला आरएसएसचाच विरोध आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षणविरोधी कोण, हे सांगताना सर्वच पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतच्या विधानावरून सध्या भाजप टीका करत आहे. राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा विपर्यास करून भाजप फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याची टीका पटोलेंनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही.

आरक्षणाला आरएसएसचाच विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे, अशी जाहीर वक्तव्ये केलेली आहेत. त्यामुळे भाजपाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असा टोलाही पटोलेंनी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी अमेरिका दौ-यात केलेल्या एका विधानाची मोडतोड करून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. वास्तविक पाहता आरक्षणाला विरोध हा भाजपच करत आलेला आहे. देशातील सर्व समाज घटकांना न्याय मिळावा यासाठी जातनिहाय जनगणना करावी व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवावी हीच काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची भूमिका आहे. परंतु भाजपचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. त्यामुळे आरक्षणविरोधी कोण आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही, असे पटोलेंनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा या निमित्याने परत एकदा समोर आला आहे. राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्यासंदर्भात विदेशात एक वक्तव्य केले आहे. एका बाजूला निवडणुकीत खोटं नॅरेटिव्ह पसरवायचे आणि दुस-या बाजूला परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करायची, भारताच्या संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीच सन्मान केला नाही. बाबासाहेबांना कधी लोकसभेत निवडून जाऊ दिले नाही. दोनवेळेला षडयंत्र करून बाबासाहेबांचा पराभव करणारा हाच काँग्रेस पक्ष आहे. मतांसाठी ते खोटे नॅरेटिव्ह तयार करतात, हे राहुल गांधी यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR