छ. संभाजीनगर : चौथी ते सातवी वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांची ने-आण करणा-या धावत्या स्कूल बसने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. स्कूल बसमध्ये तब्बल ३५ विद्यार्थी होते. या बसने अचानक पेट घेतल्यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र बसमधील दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे ३५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. ही घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ बुधवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात भराडी येथील शाळेत परिसरातील छोट्या-मोठ्या खेडेगावातील मुलं शिक्षण घेतात. शाळेत ये-जा करण्यासाठी पालकांनी मुलांना स्कूल बस लावली आहे. जवळपास परिसरातील तब्बल ५०० मुलं खाजगी वाहनाने शाळेत ये-जा करतात.
आज बुधवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी घाटनांद्रा येथून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस शाळेच्या दिशेने निघाली. मात्र धावत्या बसमधून अचानक धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी वाहन थांबवलं. यावेळी बसमध्ये बसलेल्या दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे तातडीने विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवलं. सर्व विद्यार्थ्यांना सुखरुप बसमधून खाली उतरवण्यात आलं आणि काही क्षणातच बस आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. आगीनंतर धुराळे लोट उंच हवेत लांबपर्यंत गेले होते.