भटिंडा : वृत्तसंस्था
पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील तलवंडी साबोमध्ये खासगी कंपनीची बस (पीबी ११ डीबी- ६६३१) भरधाव वेगात केंदाळ्यातील नाल्यात पडली. यामध्ये चालकासह ८ जण ठार झाले असून २४ हून अधिक जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये २ वर्षांची मुलगी आणि आईचाही समावेश आहे.
हरियाणाचा रहिवासी असलेल्या एका अपंग व्यक्तीचाही यात मृत्यू झाला. बलकार सिंग असे मृत चालकाचे नाव असून तो मानसा येथील रहिवासी आहे. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जीवनसिंग वाला गावाजवळ हा अपघात झाला. बस सरदुलगढहून भटिंडाच्या दिशेने जात होती. बसमध्ये सुमारे ५० लोक होते. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
भटिंडाचे डीसी शौकत अहमद पारे यांनी सांगितले की, बसमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांनी सांगितले की, ड्रायव्हर वेगात बस चालवत होता. तेवढ्यात समोरून एक मोठी ट्रॉली आली. ते टाळण्यासाठी बसने वळण घेतल्याने हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री मान यांनी केला शोक व्यक्त
या अपघाताबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, भटिंडाच्या तलवंडी साबो रोडवर असलेल्या लसाडा नाल्यात एका खासगी बसच्या अपघाताची दु:खद बातमी मिळाली. प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, बचाव कार्य सुरू आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.