मास्को : युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन जाणारे रशियाचे लष्करी विमान युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेल्गोरोड भागात कोसळले आहे. वृत्तसंस्थेने रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले आहे की, या विमानातील किमान ६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सशस्त्र दलाचे पकडलेले कर्मचारीही या विमानात होते. प्रादेशिक गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह म्हणाले की, त्यांना ‘घटना’ बद्दल माहिती आहे परंतु त्यांनी अधिक तपशील प्रदान केला नाही.
सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हीडीओमध्ये विमान खाली कोसळताना दिसत आहे. रशियन प्रेसिडेंशियल पॅलेसचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, क्रेमलिनला या अपघाताची माहिती आहे. परंतु त्यांनी तपशील देण्यास नकार दिला. वृत्तानुसार, वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि ते एका निवासी भागात पडले. विमानात पकडलेले ६५ युक्रेनियन लष्करी कर्मचारी होते ज्यांना देवाणघेवाण करण्यासाठी बेलग्रेड प्रदेशात नेण्यात येत होते. तसेच सहा क्रू मेंबर्स आणि तीन एस्कॉर्ट्सही देखील विमानात होते.