27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रसचिन वाझेचे अनिल देशमुख, जयंत पाटलांवर आरोप

सचिन वाझेचे अनिल देशमुख, जयंत पाटलांवर आरोप

देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते जयंत पाटील यांचाही वाझेच्या पत्रात उल्लेख अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

मुंबई (प्रतिनिधी) अँटीलिया स्फोटक प्रकरण व वसुली रॅकेट प्रकरणात सध्या तुरूंगात असलेल्या वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. अनिल देशमुख त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. सीबीआयला सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठीसुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचंसुद्धा नाव दिलयं, असे सचिन वाझेने सांगितले आहे. यामुळे या प्रकरणाला पुन्हा वेगळे वळण मिळाले आहे.

मागच्याच आठवड्यात अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. उद्धव ठाकरे यांना वसुली प्रकरणात व आदित्य ठाकरे यांना दिशा सॅलियन प्रकरणात अडकवण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. सचिन वाझे सध्या तुरूंगात बंद आहे. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात बंद आहे. त्याला रात्री वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणलं होतं. त्यावेळी एएनआयशी बोलताना त्याने हे खळबळजनक दावे केले. मी जे काही बोललो आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पीएमार्फत पैसे जायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठीसुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचंसुद्धा नाव दिलय, असं सचिन वाझेने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

वाझेंचे आरोप अनिल देशमुखांनी फेटाळले
सचिन वाझेनं केलेले आरोप अनिल देशमुख यांनी फेटाळून लावले. ही देवेंद्र फडणवीसांची नवी चाल असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. सचिव वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. दोन खुनाचा आरोप त्यांच्यावर गुन्हा आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं हायकोर्टानं म्हटल्याचाही आरोप अनिल देशमुखांनी निदर्शनास आणले. सचिन वाझे याला हाताशी धरून फडणवीस माझ्यावर आरोप करत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

वाझेचा बोलविता धनी कोण? मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी? – काँग्रेसचा सवाल
निलंबित पोलिस अधिकारी व सध्या गंभीर गुन्ह्याखाली कैदेत असलेल्या सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यामागे कोणती शक्ती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कोठडीत असलेल्या आरोपीला मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही मग सचिन वाझेलाच मीडियाला बोलण्याची परवानगी कोणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे तसेच सचिन वाझेच्या बंदोबस्तासाठी जे पोलिस होते त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख व श्याम मानव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केल्याने फडणवीस यांचा भ्रष्ट चेहरा उघडा पडला. आपले बिंग फुटले असून असत्य लपवण्यासाठी कैदेत असलेल्या सचिन वाझेला पुढे करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खोट्या गुन्ह्याखाली जेलमध्ये आहेत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकले होते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नबाव मलिक हेसुद्धा जेलमध्ये होते; पण त्यांना मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही मग सचिन वाझेलाच मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी व ती कोणी दिली? हा सचिन वाझे सरकारचा कोण लागतो? असा सवालही अतुल लोंढे यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR