24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपवारांवरील वादग्रस्त विधानानंतर सदाभाऊ खोत यांची दिलगिरी

पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर सदाभाऊ खोत यांची दिलगिरी

सांगली : प्रतिनिधी
भाजप नेते सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. यावरून जोरदार राजकारण तापले असताना आता सदाभाऊ खोत यांनी माफी मागितली आहे. त्यांनी वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप तसेच वैयक्तिक टीका करत आहेत. भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजारावर वैयक्तिक टीका केली. यामुळे आता राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांनी देखील या टीकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यानंतर आता सदाभाऊ खोत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

सांगलीतील प्रचारसभेमध्ये भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावरून राजकारण तापले. शरद पवार यांच्या आजारावरून सदाभाऊ खोत यांनी भरसभेमध्ये टीका केली. यामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला. भरसभेमध्ये त्यांच्या या टीकेमुळे अजित पवार यांनी देखील संताप व्यक्त केला होता. अगदी अजित पवार यांनी फोन करून सदाभाऊ खोत यांना खडे बोल सुनावले. त्याचबरोबर पुण्यातील सदाभाऊ खोत यांची पुण्यातील पूर्वनियोजित सभा व पत्रकार परिषद देखील ऐन वेळेला रद्द करण्यात आली. टीकेचा भडिमार झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

राजकीय वर्तुळातून जोरदार टीका झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी एक व्हीडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्या आजारपणावर टीका केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘‘माझा कुणाच्याही व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, पण काही लोकांनी त्या शब्दांच्या अर्थाचा विपर्यास केला. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी ते शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.’’

काय होते खोत यांचे वादग्रस्त विधान?
सांगलीतील प्रचारसभेमध्ये भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी भाषणावेळी वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, अरे पवार साहेब, तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी कारखाने हाणले, बँका हाणल्या, सूतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेह-यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? राज्याची तिजोरी ही गाय आहे. ती गाय शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाहिजे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, चारही थाणे ही वासराचीच आहेत. मी सर्व दूध वासरालाच देणार. मग शरद पवार साहेबांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यामुळे राजकारण तापले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR