मुंबई : मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते हे हिंदी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून गेले आहेत. हे तेच सदावर्ते आहेत, ज्यांनी आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून विनंती केली होती. युक्तिवाद करण्याची वेळ आल्यावर ते कसे काय गायब होऊ शकतात असा सवाल विचारून मुंबई उच्च न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
अभिनेता सलमान खान सूत्रसंचलन करत असलेला प्रचंड लोकप्रिय शो हिंदी बिग बॉसच्या अठराव्या पर्वात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी निर्णयाप्रत आलेली असताना युक्तिवादाच्या वेळी ते कसे काय गैरहजर राहू शकतात, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला.
मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत अशी माहिती इतर वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना मराठा आरक्षण प्रकरणाचे गांभीर्य नाही का? आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून गुणरत्न सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब कसे झाले? असे सवाल हायकोर्टाने विचारले.
युक्तीवाद संपला
मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला आहे. आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असे उच्च न्यायालयाने बजावून सांगितले. दुसरीकडे पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची उच्च न्यायालयासमोरील पूर्णपीठापुढील सुनावणी १९ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.