छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोय-यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यावे, यावर ठाम आहेत. जरांगेंच्या या मागणीला लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शवत गेल्या काही महिन्यांमध्ये वाटण्यात आलेले बोगस कुणबी दाखले रद्द करावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेले एक बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरली आहे.
यापैकी एक बॅनर छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात लावण्यात आले आहे. या माध्यमातून सगेसोय-यांच्या आरक्षणाला स्पष्टपणे विरोध करण्यात आला आहे. आर. बी. फाऊंडेशनकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख शुभेच्छुक असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही मराठा समाजाला सगेसोय-यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यायला विरोध केला आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.