33.5 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्रसैफला २५ लाखांचा मेडिक्लेम केला मंजूर

सैफला २५ लाखांचा मेडिक्लेम केला मंजूर

सामान्यांना का नाही, मेडिक्लेम संघटनेची ईर्डाकडे तक्रार

मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील लीलावती रुग्णालयात ४ दिवस उपचार करण्यात आले. चोरट्याने मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने घरात घुसून सैफवर चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. ४ दिवसांच्या उपचाराचा खर्च तब्बल ३६ लाखांपर्यंत गेल्याचे माहितीतून समोर आले. दरम्यान, सैफला २५ लाखांचा कॅशलेस मेडिक्लेम मंजूर झाला. यावर मुंबई असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटसने नाराजी व्यक्त केली. सामान्य पॉलिसीधारकांना मिळणा-या सुविधांपेक्षा ही मंजुरी अधिक असून, सैफसाठी मेडिक्लेम कंपन्यांचा वेगळा न्याय का, असा सवाल उपस्थित केला आहे.

मुंबईतील या संघटनेने इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेन्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीए) विमा नियामक प्राधिकरण यांना पत्र लिहून कॅशलेस क्लेम, सेलिब्रिटीज यांना देण्यात येणारी विशेष वागणूक, सर्वसामान्यांना इन्शुरन्स क्लेम देताना केली जाणारी वागणूक, यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संघटनेचे १४ हजार सदस्य आहेत. या संघटनेच्या मते, सेलिब्रिटी आणि उच्च-प्रोफाइल व्यक्तींना मिळणारे प्राधान्य हे सामान्य पॉलिसीधारकांवर अन्याय करत आहे.

त्यामुळे विमा प्रक्रियेत पारदर्शकता आणि समानता असायला हवी, अशी मागणी त्यांनी ईर्डाकडे केली आहे. तसेच लहान नर्सिंग होम्स आणि रुग्णालयांना विमा कंपन्यांकडून मिळणा-या देय दरांमध्ये तफावत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आणि सर्वसामान्य विमानधारकांना आणि नर्सिंग होमला समान न्याय दिला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे, असे पत्रात म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR