30 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र

मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी विविध मार्गांनी लढा दिला जात आहे. तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.

त्या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना पत्र लिहून मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत आवाज उठवावा, असे आवाहन संभाजीराजेंनी केले आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत मुद्यावर ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवले आहे.

महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना लिहिलेल्या पत्रात संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. यासाठी अनेक भव्य मोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली आहेत. काही युवकांनी यासाठी आत्महत्यासारखा टोकाचा मार्ग निवडला. समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरीही मराठा समाजाने आपली मागणी अतिशय शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने पुढे आणलेली आहे. मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देऊन २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने तर २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदेशीर पातळीवर हे आरक्षण टिकले नाही.

ते पुढे म्हणाले की, मी स्वत: २००७ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलनांत सक्रिय सहभाग नोंदवत काही आंदोलने स्वत: देखील केली आहेत. राज्यसभा सदस्य असताना सभागृहात देखील हा विषय सविस्तरपणे मांडला होता. तसेच संसद परिसरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलनही केले होते. मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाचे लाखो युवक हे देखील आंदोलनात सहभाग घेत आहेत. या पार्श्वभूमीवर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उठवणे आवश्यक आहे.

याविषयी लवकरच नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदारांनी एकत्रित मराठा आरक्षण मिळवण्याबाबत ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीचे सविस्तर निमंत्रण मी लवकरच आपणास पाठवेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत आणि समाजाला न्याय मिळावा ही विनंती, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR