27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रराहुल गांधींच्या कोल्हापूरातील जेवणाचे घेतले नमुने

राहुल गांधींच्या कोल्हापूरातील जेवणाचे घेतले नमुने

कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते, खासदार राहुल गांधी यांनी उचगावमध्ये टेम्पो चालकाच्या घरी जाऊन जेवण केले. त्याची सर्व माहिती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतली आहे. गांधी यांनी खाल्लेले सर्व पदार्थ २४ तास सुरक्षित ठेवले. प्रोटोकॉलनुसार हे सर्व केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व्यक्ती दौ-यावर येणार असल्यास त्याचे अतिशय सूक्ष्म पद्धतीने सर्व नियोजन प्रशासनाकडून केले जाते. त्यामुळेच त्यांच्या दौ-यातील ताफ्यातील वाहनांची संख्या वाढते. नुकतेच गांधी कोल्हापुरात येऊन गेले. त्यावेळी हॉटेल सयाजी, मुख्य कार्यक्रम असलेल्या कसबा बावड्यातील भगवा चौक आणि विमानतळावरही अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक तैनात होते. तेथे गांधी जे काही खाणार किंवा खाल्ले त्याची खातरजमा करण्याचे काम या विभागाकडे होते. मात्र, गांधी अचानकच उचगावमध्ये टेम्पो चालकाच्या घरी गेले.

त्यामुळे तेथे या विभागातील अधिका-यांना पोहोचता आले नाही. कारण ती अचानक भेट होती. तरीही तेथील जे जेवण गांधी यांनी खाल्ले त्याचे नमुने तेथे असलेल्या सिक्युरिटीतील पोलिसांनी घेतले होते. त्याची माहिती त्यांनी येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. पुढे गांधी पुन्हा दिल्लीत पोहोचेपर्यंत ते सर्व निरीक्षणाखाली ठेवले होते, असेही सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी सांगितले.

नियमानुसार प्रक्रिया पार पाडली
कोणत्याही व्हीआयपी दौ-यात जे काही संबंधित व्यक्ती खाणार आहेत किंवा खाल्ले त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली जाते. जे व्हीआयपी व्यक्तीने खाल्ले तेच स्थानिक व्यक्तीला खाण्यास दिले जाते. त्याच्यावर त्याचा काही परिणाम होतो काय, यावरही २४ तास लक्ष ठेवले जाते. प्रोटोकॉलप्रमाणे हे सर्व करावे लागते, असेही शिंगाडे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR