सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री आणि माजी महसूलमंत्री सध्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोलापुरात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. वाळूच्या गाड्या आपल्याच लोकांच्या आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे जिल्हाधिका-यांना सांगितले होते, अशी कबुली विखे-पाटील यांनी दिली. यानंतर मात्र विखे-पाटील यांनी सारवासारव केल्याचे दिसत आहे.
झाले असे की, टेंभुर्णीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर माहिती-तंत्रज्ञान, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम, माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विखे-पाटलांनी म्हटले, ‘येथे स्टेजवर कुमार आशीर्वाद असले तरी शेवटी त्यांना मागे मी म्हटले होते, वाळूंच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करा. गाड्या चालू राहू द्या. काय फरक पडत नाही. आपले लोक आहेत सगळे ’ मंत्री विखे पाटलांनी अशी कबुली दिल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्मितहास्य केले.
गोरेंनी सावध करताच विखेंनी ‘क्रशरच्या गाड्या आहेत,’ असे विखे-पाटलांनी विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बघून सांगितले. परंतु, गोरेंनी सावध करताच विखेंनी वाळूबद्दल बोलणे आवरते घेतले.
कार्यक्रम संपल्यावर पत्रकारांनी वाळूच्या विधानाबद्दल विचारल्यावर विखे-पाटील यांनी सारवासारव केली. विखे-पाटील म्हणाले, सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेऊ नका. सगळ्या गोष्टी गमतीने बोलतो माणूस. वाळू धोरणाच्या बाबतीत आम्ही अतिशय कडक आहोत. अधिका-यांवरदेखील कारवाई केली आहे. माझा नेहमीच वाळू काढण्याला विरोध राहिला आहे.
दरम्यान, शिंदे सरकारमध्ये विखे-पाटील महसूलमंत्री होते. २०२२-२३ मध्ये विखे-पाटील हे १ वर्ष १ महिना सोलापूरचे पालकमंत्री होते. महसूलमंत्री असताना विखे-पाटलांनी वाळूमाफियांबद्दल नरमाईची भूमिका घेतली का? वाळूमाफियांशी विखे-पाटलांचे काही संबंध होते का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.