छ. संभाजीनगर : आतापर्यंत झाले ते झाले. यापुढे संदिपान भुमरे आणि त्यांच्या सुपुत्राला घाबरण्याची अजिबात गरज नाही. भुमरे आता आमदार नाहीत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्यांना कोणताही जनता दरबार घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. सभापती, उपसभापतींच्या दालनाला कुलूप लावा. जर कोणी जनता दरबार घेतला तर मला सांगा मी बघतो काय करायचे ते? अशा शब्दांत शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैठणमधील शासकीय अधिका-यांना सूचना दिल्या.
जिल्ह्यातील शिवसेनेच्या ‘शिवसंकल्प’ बैठकांची सुरुवात अंबादास दानवे यांनी पैठण तालुक्यापासून केली. आडुळ आणि पाचोड येथे जिल्हा परिषद सदस्यांची व तालुक्यातील अधिका-यांची बैठक दानवे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी संदिपान भुमरे व त्यांचे सुपुत्र विलास भुमरे यांच्या दबावात तालुक्यातील सगळे प्रशासकीय अधिकारी काम करत असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या.
संतापलेल्या अंबादास दानवे यांनी प्रशासकीय अधिका-यांना दम देत भुमरे पिता-पुत्रांच्या दबावाला अजिबात बळी पडू नका, त्यांना घाबरण्याची गरज नाही. संदिपान भुमरे आता आमदार नाहीत. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते खासदार झाल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे पैठण तालुक्यात जनता दरबार घेण्याचा अधिकार राहिलेला नाही.
जर कुणी जोर जबरदस्तीने सभापती, उपसभापतींच्या दालनात बसून कारभार करत असेल तर त्याला कुलूप ठोका. पदावर नसताना आणि कोणताही अधिकार नसताना जर भुमरे किंवा त्यांचे सुपुत्र अधिका-यांना धमकावत असतील, जनता दरबार भरवत असतील तर त्याचे व्हीडीओ शूटिंग करून मला पाठवा. मग मी बघतो त्याचे काय करायचे,असा इशाराही अंबादास दानवे यांनी यावेळी दिला.
अधिका-यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की जालना जिल्ह्याचे खासदार डॉ. कल्याण काळे हे आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघ हा त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो. शिवाय संदिपान भुमरे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले असल्यामुळे ते आता आमदार किंवा राज्याचे मंत्री राहिलेले नाहीत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत जे घडले ते घडले. यापुढे मात्र त्यांनी जनता दरबार भरवण्याचा आग्रह केला तर अधिका-यांनी त्यांना विरोध केला पाहिजे.