पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेला ठाकरे गटातील पक्षप्रवेश अखेर आज पार पडला. पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर संजोग वाघेरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. ‘मातोश्री’वर झालेल्या या पक्षप्रवेशासाठी खुद्द उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनीच संजोग वाघेरेंना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. संजोग वाघेरेंचा हा पक्षप्रवेश पिंपरी-चिंचवड व मावळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकीकडे मूळ पक्षातून बाहेर पडून अजित पवार गटाने वेगळा सवतासुभा निर्माण केल्यामुळे आधीच स्वपक्षीय मतदारवर्गाचा काहीसा रोष अजित पवार गटावर असताना आता गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. वाघेरे यांचे वडील भिकू वाघेरे पिंपरी-चिंचवडचे महापौर होते. वाघेरे घराणे हे पवार कुटुंबाशी एकनिष्ठ मानले जाते. स्वत: वाघेरेंनीही महापौरपद व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्षपद भूषवले आहे. पक्षफुटीनंतर ते अजित पवार गटाकडे गेले होते. आता मात्र त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
संजोग वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनामुळेच आपण या विषाणूला रोखू शकलो. तेव्हाच मी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीने प्रभावित झालो होतो. संजय राऊतही दररोज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला दिशा देण्याचे काम करत असतात’, असे संजोग वाघेरे यावेळी म्हणाले.