मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या जिल्ह्याची राज्यभर चर्चा सुरू आहे, त्या बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्याऐवजी, अजित पवारांकडे बीडचे पालकत्व देण्यात आले आहे. बीडसोबतच पवारांकडे पुण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येमुळे बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मुंडेंना तीव्र विरोध होत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या हत्येचा आरोप धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर असल्यामुळे, विरोधक सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तसेच, बीडमधील मराठा समाजाचाही धनंजय मुंडेंच्या नावाला विरोध होता. अशा परिस्थितीमध्ये मुंडेंना बीडचे पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अखेर यादी आली अन् त्यातून मुंडेंचे नाव वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे, धनंजय मुंडेंना फक्त बीडच नाही, तर कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथेप्रमाणे राज्यातील सर्वात संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व घेतले आहे तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. तर, पंकजा मुंडे यांना जालन्याच्या पालकमंत्री असतील. याशिवाय, दोन जिल्ह्यांत सहपालकमंत्री असणार आहे. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफऐवजी प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांना जबाबदारी दिली आहे. तर, मुंबई उपनगरची जबाबदारी आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असेल.