बीड : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. या प्रकरणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवान गडावर पोहोचले.
नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर करतानाच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी भगवान गडावर जाण्याचा निश्चय बोलून दाखवला. तसेच सर्व पुरावे महाराजांसमोर ठेवणार आहे आणि आता त्यांच्याचकडे न्याय मागणार आहे, असा निर्धार बोलून दाखवला होता. त्यानुसार, संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले. धनंजय देशमुख यांनी महंत नामदेवशास्त्री यांच्यासमोर सगळी कागदपत्रे, पुरावे ठेवले. यावेळी नामदेवशास्त्री यांनी संतोष देशमुख कुटुंबाला शब्द दिला.
धनंजय देशमुखांनी सगळ्यांसमोर नामदेवशास्त्रींना पुरावे दाखवले
धनंजय देशमुख यांच्यासह वैभवी देशमुख यांनी नामदेवशास्त्रींची भेट घेताना मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सगळ्यांसमोर धनंजय देशमुख यांनी थेटपणे नामदेवशास्त्रींसमोर पुरावे देताना त्यांची बाजू सांगितली. देशमुख कुटुंबाने कधी जातीवाद केला नाही. देशमुख कुटुंबियांची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यांपासून कसत आहे. प्रामाणिकपणे सांगतो. मनोहर मुंडेंची चार मुले होती. दोन मुले पुण्यात होती. दोन मुले इथे. त्यांनी जे पिकवले ते आम्ही खातो. देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्यांच्या हत्येनंतर दिसले असते. दलित बांधवाला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेले होते. आमची कोणतीही गुन्हेगारी नाही.
न्याय मागणा-याला चुकीचे ठरवू नका : धनंजय देशमुख
या ठिकाणी आरोपींबाबत बोलताना माझ्या अंगावर शहारे येत आहेत. या प्रकरणाबाबत बोलण्याची ही जागा नाही. गादीसमोर बोलताना खूप त्रास होत आहे. योग्य माहिती घेतल्याशिवाय बोलणे योग्य नाही. गादीसमोर येऊन गडावरून परत जाताना चांगल्या गोष्टींची शिदोरी आपण नेतो. पण आरोपींची मानसिकता तपासायला हवी, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
नामदेवशास्त्री काय म्हणाले?
भगवान बाबांना मानणारे देशमुख कुटुंब आहे. जातीय सलोखा या गावात आहे. यापूर्वी किती वेळा गडावर आले, हे त्यांनी दाखवले. भगवान गड तुमच्या पाठीशी कायम राहील, ही ग्वाही देतो. आरोपींची पार्श्वभूमी असलेले पुरावे त्यांनी दिले. धनंजय यांचे म्हणणे आहे की, याला जातीयवादाचे स्वरूप देऊ नका. भगवान गड कायमस्वरूपी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहील जातीयवाद न करता ख-या आरोपीला शिक्षा व्हावी हे गादीवरून सांगणे आहे. या शब्दांत महंत नामदेवशास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आश्वासन दिले.